MAHANAYAK dated 11july 2016 ज्यांना सत्य स्थिती दडवून परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा असतो त्यांना जनतेचा भावनात्मक उद्रेक घडवून आणणे आवश्यक असते. जनता अधिक भावनाविवश व्हावी यासाठी वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या अत्यंत खोट्या अफवा जनतेमध्ये पसरविण्यात येत आहेत. वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या पण लोकांच्या भावनेला हात घालणाऱ्या अफवा पसरवून अराजक माजविणारे आंदोलन करण्याचे तंत्र एकतर जहाल हिंदुत्ववादी संघटना किंवा डाव्या-अतिडाव्या संघटनांच्या फ्रंट संघटना अवलंबितात. आंबेडकर भवनच्या वादात असाच भावनात्मक उद्रेक निर्माण करण्यात आला आहे.आंबेडकरी चळवळीत हे प्रथमच घडत आहे.याहीपुढे जाऊन जे कोणी या वादात ऍड.प्रकाश आंबेडकर यांची बाजू घेत नाहीत त्यांना सोशल मीडियातून व अन्य प्रकारे शिवीगाळ करणे, वैय्य्कतीक गलिच्छ आरोप करणे, ठार मारण्याच्या धमक्या देणे, त्यांना आर.एस.एस.चे दलाल म्हणणे, हे प्रकार काही आततायी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत. आंबेडकरी चळवळीचे हुकूमशाहीकरण करण्याची व विरोधकांची मुस्कटदाबी करण्याची ही स्टालिनवादी वृत्ती अल्पसंख्यकांच्या लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ज्या गटाचे नेतृत्व करतात त्या गटामध्ये खोलवर रुजली आहे हे अत्यंत लज्जास्पद आहे.